अबूधाबी- मागील आठवड्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीतील सदस्यलाही लागण झाल्याचे समोर आले होते. आता दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली संघाचे सहाय्यक फिजीओ यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. याची पूष्टी दिल्ली संघाने दिली आहे.
दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटलं की, 'रविवारी सायंकाळी सहाय्यक फिजीओंचा रिपोर्ट आला. यात ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुबईत दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या दोन चाचण्यांमध्ये ते निगेटिव्ह आढळले होते, पण त्यांच्या तिसऱ्या चाचणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आढळला आहे.
फिजिओ आतापर्यंत, कोणताही खेळाडू किंवा फ्रेंचायझी स्टापच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे. क्वारंटाइननंतर त्यांची चाचणी केली जाईल, यात ते निगेटिव्ह आले तर त्यांना दिल्लीचा संघात सामिल होता येईल, असेही दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.