आबूधाबी -आयपीएल २०२० च्या सलामी सामन्याला १० दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर कोरोनावर मात करून संघात परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने ही माहिती दिली.
सीएसकेचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी सांगितले की, दीपक चहर याच्या दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. यामुळे तो बायो सिक्युर बबलमध्ये परतला आहे. पण त्याची नियमानुसार, कार्डियो टेस्ट केली जाणार आहे. यानंतर पुन्हा त्याची कोरोना चाचणी केली जाईल. यात तो निगेटिव्ह आला तर तो सरावाला सुरुवात करेल. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडचा क्वारंटाईन कालावधी १२ सप्टेंबरला पूर्ण होणार आहे.
कोरोनावर मात केल्यानंतर दीपक चहरने ट्विट करून आपल्या तंदुरूस्तीची माहिती दिली. 'तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि प्रेमासाठी खूप खूप आभार. मी आता तंदुरूस्त आहे. स्वत:ला अधिक तंदुरूस्त ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. लवकरच मी मैदानावर क्रिकेट खेळताना दिसेन. माझ्यावर असेच प्रेम करत राहा', असे ट्विट त्याने केले आहे.
मागील महिन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंसह स्टापमधील १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांच्या दोन चाचण्या करण्यात आल्या. यात जे निगेटिव्ह आले त्यांना संघासोबत राहण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, दीपक चहर चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये ३४ सामन्यात ३३ गडी बाद केले आहेत. मागील हंगामात त्याने १७ सामन्यात २२ गडी बाद केले होते.
हेही वाचा -पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ