अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महत्वपूर्ण सामना होत आहे. आजचा विजेता संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिल आणि त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. मात्र पराभूत संघाच्या प्ले ऑफचा मार्ग बिकट होईल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकते किंवा निव्वळ धावगतीवर त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. उभय संघ तुल्यबळ असल्याने हा सामना रंगतदार होण्याची आशा आहे.
दिल्लीसाठी सलामी जोडी ठरतेय डोकेदुखी -
दिल्लीच्या संघात शिखर धवन, श्रेयस अय्यर व ऋषभ पंत हे युवा खेळाडू आहेत. तसेच कागिसो रबाडासह एनरिक नार्जिया भेदक मारा करण्यास सक्षम आहे. पण दिल्लीसाठी सलामी जोडी डोकेदुखी ठरली आहे. पृथ्वी शॉ व अजिंक्य राहणे यांनी धवनसोबत सलामीला जोडी बनविली, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. धवन गेल्या तीन सामन्यात अपयशी ठरला आहे. दिल्लीची मधली फळीही विशेष यशस्वी ठरलेली नाही.
विराट-डिव्हिलियर्सवर बंगळुरूची मदार -
दुसरीकडे बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल सातत्याने धावा करत आहे. पण त्यांचा दुसरा सलामीवीर अॅरोन फिंचला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स मागील दोन सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. गोलंदाजीत फिरकीपटू युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर हे प्रभावी मारा करत आहेत.
दिल्ली-बंगळुरू सामन्याला उपांत्यपूर्व सामन्याचे स्वरुप -
दिल्ली व बंगळुरू यांच्यातील सामन्याला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील काही सामन्यात उभय संघांना सातत्याने पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्लीने सलग चार तर आरसीबीने सलग तीन सामने गमावले आहेत. आता हे दोन्ही संघ पराभवाची मालिका खंडित करीत अव्वल दोनमध्ये स्थान निश्चित करण्यास उत्सुक आहेत.
...तर पराभूत संघही ठरू शकतो प्ले ऑफसाठी पात्र
दिल्ली बंगळुरू यांच्यातील विजेता संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन संधी मिळतील. तसेच पराभूत संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतो. पण त्यासाठी त्याला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.