आबुधाबी - कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळवला जात आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. या बायो बबलचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले असून ते नियम तोडणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आता चेन्नईच्या एका खेळाडूने या बबलच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
सीएसकेचा वेगवान गोलंदाज केएम आसिफने बायो बबलच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. घडलं असे की, आसिफकडून त्याच्या हॉटेलच्या रूमची चावी हरवली होती. त्यानंतर आसिफ दुसरी चावी घेण्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला. परंतु, प्रोटोकॉलनुसार रिसेप्शन एरियाचा बायो बबलमध्ये समावेश होत नाही. त्यामुळे आसिफला बायो बबल तोडण्यासाठी ६ दिवसांसाठी क्वॉरंटाइन राहावे लागले.
आसिफची ही पहिलीच चूक होती, त्यामुळे फक्त क्वॉरंटाइन ठेवण्यात आले आहे. पण जर आसिफने या हंगामामध्ये पुन्हा एकदा चूक केली तर मात्र त्याला या हंगामातून बाहेर काढले जाऊ शकते.
सीएसकेच्या मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार, आसिफचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. यामुळे त्याने संघासोबत पुन्हा प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आसिफ आयपीएलचा बायो बबलचे नियम मोडणारा पहिला खेळाडू ठरला आहे.