शारजाह - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या सत्रातील चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला राजस्थान रॉयल्सविरुद्ध १६धावांनी पराभव पत्करावा लागला. मंगळवारी खेळलेल्या या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.
एनगिडीने टाकलेल्या २०व्या षटकात ३० धावा चोपल्या गेल्या. या धावांमुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे २०वे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे. या षटकात राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने दे-दणादण फलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली.
लुंगीच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्राने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार वसूल केला, पण हा नो बॉल असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. हा चेंडूही नो बॉल होता. यानंतर गोलंदाज लुंगीने आणखी चेंडू टाकला. मात्र, त्या चेंडूला पचांनी वाईड घोषित केले. त्यामुळे जोफ्राने यावेळी फक्त दोन चेंडूत २७ धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर षटकाचा तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि पुढच्या तीन चेंडूवर प्रत्येकी एक धाव राजस्थानला घेता आली.