दुबई - राजस्थानच्या मुंबईवरील विजयामुळे चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामातून बाहेर फेकला गेला आहे. राजस्थानने १२ सामन्यांत ५ विजयासह १० गुणांची कमाई केली आहे. चेन्नईने तितक्याच सामन्यात ८ गुण कमावले आहेत आणि आता त्यांना काही केल्यास प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता येणार नाही. पण ते इतर संघाचे गणित बिघडवू शकतात. वाचा चेन्नईचा संघ कोणत्या संघाचे गणित बिघडवू शकतो...
म्हणून बिघडू शकते गणित
चेन्नईचे १२ सामने झाले असून आणखी दोन सामने ते खेळणार आहेत. यात त्यांचा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्याशी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही संघ प्ले ऑफच्या शर्यतीत असून त्यांच्यासाठी प्रत्येक सामना 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. अशात चेन्नईने जर दोन्ही संघांना पराभूत केले तर प्ले ऑफचे गणित वेगळे होऊ शकते.
कोलकात्याने ११ सामने खेळली असून यात ते ६ विजयासह १२ गुणांची कमाई करत चौथ्या स्थानावर आहेत. पंजाब ११ सामन्यात १० गुणांसह पाचव्या स्थानी आहे. काल रविवारी राजस्थानने मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह राजस्थानचे १२ सामन्यात १० गुण झाले आहेत.