दुबई - युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामामध्ये मॅच फिक्सिंगसाठी सट्टेबाजांनी खेळाडूशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. याची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाचे (एसीयू) प्रमुख अजित सिंग यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सट्टेबाज एजंटने आयपीएलच्या खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत संपर्क केला आहे. दरम्यान, सट्टेबाजांनी संपर्क साधलेला खेळाडू कोण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बीसीसीआयच्या एसीयू प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये एका खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी सट्टेबाजाकडून विचारणा करण्यात आली आहे. त्या खेळाडूने याची तात्काळ माहिती आम्हाला कळवली आहे. आम्ही त्या एजंटचा शोध घेत आहोत. पण, यासाठी थोडा वेळ लागेल. भ्रष्टाचारविरोधी नियमानुसार माहिती देणाऱ्या खेळाडूबाबत सध्या कोणालाही काहीही सांगण्यात येणार नाही.