दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या, प्ले ऑफ फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्ले ऑफचे सामने अबुधाबीमध्ये खेळवण्यात येतील. तर स्पर्धेचा अंतिम सामना दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने रविवारी स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीच्या वेळापत्रकाची घोषणा केली.
पहिला क्वालिफायर सामना ५ नोव्हेंबरला गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघात होईल. यात जिंकणार संघ अंतिम फेरी गाठेल. तर ६ नोव्हेंबरला तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर असलेल्या संघामध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल. यानंतर ८ नोव्हेंबरला अबुधाबीमध्ये क्वालिफायरमध्ये पराभूत झालेला संघाचा सामना एलिमिनेटरमध्ये विजय मिळवलेल्या संघात होईल. यात जिंकलेल्या संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
दरम्यान, आयपीएल २०२० च्या प्ले ऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण मुंबई, दिल्ली, बंगळुरू या संघांनी प्रत्येकी १४ गुणांची कमाई करताना प्ले ऑफच्या उंबरठ्यावर मजल मारली आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाइट रायडर्स १२ गुणांसह आघाडीवर आहे. असे असले तरी किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद यांना देखील संधी आहे.