हैदराबाद - नुकताच आयपीएल २०२० हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. पण या लिलावात अॅरोन फिंच एक असा खेळाडू आहे जो आठव्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. यंदाच्या लिलावात त्याला बंगळुरु संघाने खरेदी केले आहे. पण तो यापूर्वी वेगवेगळ्या ७ संघाचा सदस्य राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अॅरोन फिंच याला बंगळुरुच्या संघाने ४ कोटी ४० लाखांची बोली लावून आपल्या संघात घेतले. बंगळुरु हा फिंचचा आयपीएल स्पर्धेतील आठवा संघ ठरला.
२०१० मध्ये फिंचने आयपीएल कारकीर्दीची सुरूवात केली ती राजस्थान रॉयल्स संघाकडून. त्या पुढील दोन हंगाम त्याने दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले. नंतर पुढच्या हंगामात त्याला पुणे वॉरियर्स संघाने विकत घेतले. तर २०१४ च्या आयपीएलमध्ये तो हैदराबाद संघाकडून आणि २०१५ मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून मैदानात उतरला. २०१६ मध्ये तो गुजरात लायन्स संघाचा खेळाडू ठरला.