दुबई - महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर एक मोठी अडचण उद्भवली आहे. चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाटी रायुडू दुखापतीतून अद्याप सावरू शकलेला नाही. यामुळे तो दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. चेन्नईच्या तंबूत या कारणाने चिंतेचे वातावरण आहे.
चेन्नईने आयपीएलच्या तेराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत स्पर्धेची दणक्यात सुरूवात केली. मुंबईविरुद्धच्या विजयी सामन्यात रायुडूने महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर त्याला दुखापत झाली. या कारणाने तो दुसऱ्या सामन्यात राजस्थाविरुद्ध खेळू शकला नाही. चेन्नईला या सामन्यात पराभव पत्कारावा झाला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रायुडूची अनुपस्थिती चेन्नईला प्रकर्षाने जाणवली. मात्र आता रायुडू दुखापतीतून अद्याप सावरलेला नसल्याने तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही खेळणार नाही.
सीएसके संघाच्या सीईओनी दिलेल्या माहितीनुसार, रायुडूला हेमस्ट्रिंग इंज्युरी झाली असून ही दुखापत गंभीर नाही. पण त्याला विश्रांतीची गरज असून तो दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. या सामन्यानंतर रायुडू अंतिम संघात खेळण्यासाठी सज्ज होईल.