मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १९ सप्टेंबरला अबूधाबी येथे गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज सलामीच्या सामन्यासाठी मैदानात उतरतील. तत्पूर्वी दिग्गज समालोचक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने, त्याच्या आवडीची मुंबई इंडियन्स इलेव्हन निवडली आहे. त्याच्या मते, या हंगामात हार्दिक पांड्या मुंबईसाठी जबरदस्त कामगिरी करेल.
आकाश चोप्राने त्याच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने मुंबई इंडियन्सच्या अंतिम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. त्याच्या मते, या खेळाडूंसह मुंबईने मैदानात उतरलं पाहिजे.
सलामीवीर फलंदाज म्हणून आकाश चोप्राने यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्माची निवड केली आहे. रोहित लयीत असून त्याने या हंगामात सलामीला उतरले पाहिजे, असे चोप्राचे मत आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याने सुर्यकुमार यादवला बढती दिली आहे. सुर्यकुमार मधल्या फळीत खेळतो. पण त्याला वरच्या फळीत संधी द्यायला हवी, असे चोप्राला वाटते.
चोप्राने चौथ्या क्रमाकांवर डावखुरा ईशान किसनला तर पाचव्या स्थानावर हार्दिक पांड्याला पसंती दिली आहे. हार्दिक स्व:बळावर एकहाती सामना जिंकून देऊ शकतो, असे चोप्राने सांगितलं. सहाव्या क्रमांकावर त्याने दिग्गज अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डला ठेवले आहे. याशिवाय क्रुणाल पांड्याला त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात ठेवलं आहे. आकाश चोप्राने मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराह, नाथन कूल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर यांच्यावर सोपवली आहे.