अबुधाबी -आयपीएल तेराव्या हंगामात बुधवारी बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराजने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. सिराजने लागोपाठ २ ओव्हर मेडन टाकून कोलकात्याच्या ३ विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात २ मेडन ओव्हर टाकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. सिराजने या सामन्यामध्ये ४ ओव्हरमध्ये ८ धावा देत ३ गड्यांना तंबूत माघारी धाडलं.
मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्याच षटकात कोलकाता नाइट रायडर्सला दोन चेंडूत दोन धक्के दिले. त्याने सलामीवीर राहुल त्रिपाठीला बाद केले. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने नितीश राणाला शून्यावर क्लिन बोल्ड केले. पुढच्या ओव्हरमध्ये त्याने टॉम बँटनला माघारी पाठवले. विशेष बाब म्हणजे, सिराजने या सामन्यामध्ये एकही चौकार अथवा षटकार दिला नाही.
रिक्षा चालकाचा मुलगा मोहम्मद सिराज -
मोहम्मद सिराजचा जन्म हैदराबादमध्ये झाला. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पण रिक्षाचालक असूनही त्यांनी सिराजला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. सिराजला क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी नेहमी आणून दिल्या. मोहम्मद सिराज दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा. एवढेच नाही तर, कित्येक वेळा रात्रीही सराव करायचा. यामुळे अनेकदा सिराजला आईचा मारही खावा लागला.
मोहम्मद सिराजची आयपीएलमधील सुरुवात संघर्षमय झाली. २०१७मध्ये त्याला हैदराबादने २.६ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले. पण त्याची त्या हंगामात कामगिरी उल्लेखनीय ठरली नाही. त्याला २०१७ सालीच भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. पण या सामन्यात तो महागडा ठरला.
२०१९ मध्ये तो बंगळुरू संघात दाखल झाला. हा हंगाम सिराजसाठी काही खास ठरला नाही. ९ सामन्यांत त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या आणि ९.५५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या मोसमात त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. पण, वर्षभरात सिराजने प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे फळ कालच्या सामन्यात पाहायला मिळाले.