मुंबई - येत्या २३ मार्च पासून आयपीएल २०१९ चे बिगुल वाजणार आहे. प्रत्येक संघाने जेतेपदासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आर. अश्विनच्या नेतृत्वात मैदानात उतरतोय. कागदावर मजबूत असलेला हा संघ आयपीएलचा किताब जिंकण्याच्या प्रतिक्षेत आहे.
२०१४ साली पंजाबच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मझल मारली होती. पण निर्णायक सामना जिंकण्यात सपशेल अपयशी ठरला. मागील वर्षी या संघाने अश्विनच्या खांद्यावर संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली. सुरुवातीच्या काही सामन्यात संघाने दमदार कामगिरी केली. पण शेवटपर्यंत कामगिरीत संघाला सातत्य दाखविता आले नाही.
यंदा त्यांचा संघ न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवत आहे. हेसन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडच्या संघाने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत मझल मारली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये फ्रेंचाइजीला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागील वर्षी पंजाबचा संघ सातव्या स्थानावर होता.
यंदा पंजाबच्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांनी तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये धमकेदार प्रदर्शन करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला ८.४ कोटी रुपये देऊन संघात घेतले आहे. वरुण एक मिस्ट्री गोलंदाज आहे. त्याची बेस प्राइज २० लाख रुपये होती. तसेच इंग्लंड अष्टपैलू सॅम कर्रन यांच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात तो जास्त चर्चेत होता. भारतीय संघ सॅमच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पराभूत झाला होता. तसेच विंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनही संघात आहे.
पंजाबच्या संघाकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ४२४ धावा कुटल्या आहेत. चांगल्या फॉर्मात असलेला कसोटीपटू मयंक अगरवाल आणि केएल राहुल हे देखील पंजाबकडून दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहेत. विरोधी संघासाठी आर. अश्विन आणि अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रहमान हे दोघे आपल्या जादुई फिरकीने अडचणीत आणू शकतात.
असा आहे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ
रविचंद्रन अश्विन , केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, करुण नायर, डेविड मिलर, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, वरुण चक्रवर्ती, सॅम कर्रन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, मोइजेस हेनरिक्स, हार्डस विल्जोएन, दर्शन नाल्कंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बरार, मुरुगन अश्विन