मुंबई - भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रेंचायझीने याबाबतची घोषणा केली. दरम्यान, मागील हंगामात दिल्ली संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दिल्ली संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी वर्णी लागल्यानंतर अजय म्हणाले की, 'दिल्लीसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. दिल्ली संघातील खेळाडूंसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. संघाला भेटण्यासाठी आणि त्यांच्या यशात हातभार लावण्यास मी अजून वाट पाहू शकत नाही. ही संधी दिल्याबद्दल मी दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाचा आभारी आहे.'
दरम्यान, अजय यांनी नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत आणि विजय हजारे करंडक स्पर्धेत आसाम संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच ते पंजाबचेही प्रशिक्षक राहिले आहेत. भारतीय महिला संघाचा क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षक प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. प्रथमच ते आयपीएलच्या फ्रेंचायझीशी जोडला गेले आहेत.