लाहोर- विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले. तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज बुधवारी पत्रकार परिषद घेत इंजमामने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
मला जेवढं संघासाठी करणे शक्य होते. तेवढं मी केले. मात्र, आता मला वाटते की मी आपल्या पदाचा राजीमाना द्यायला हवा. त्यामुळे मी राजीमाना देत आहे. क्रिकेट हेच माझे जीवन आहे. मात्र मी निवड समितीचा भाग होऊ इच्छित नसल्याचं, इंजमाम लाहोरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
तसेच तो बोलताना पुढे म्हणाला, मी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर खुश आहे. बॅडलक असल्याने पाकचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला नसल्याचे इंजमामने सांगितले. दरम्यान, इंजमामने राजीनामा दिला असला तरी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला गरज असल्यास मी कोणत्याही पदावर काम करण्यास तयार असल्याचे तो म्हणाला.
विश्वकरंडक स्पर्धेत पााकिस्तानच्या संघाने 9 सामने खेळले आहेत. यामध्ये पाकिस्तानने 5 सामने जिंकले. एक सामना पावसाअभावी झाला नाही. तर उर्वरित 3 सामन्यात पाक पराभूत झाला. पाकच्या संघाला 11 गुण मिळवूनही उपांत्य फेरी गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या संघाने उत्तम रनरेटमुळे उपांत्य फेरी गाठली.