मुंबई - पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने ऋषभ पंतची बॅटिंग स्टाइल सेहवाग सारखी असल्याचे म्हटलं आहे. पंत जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा मला सेहवागच डाव्या हाताने खेळत असल्याचा भास होतो. या दोघांना संघ कितीही दबाव असला तरी फरक पडत नाही, असे देखील इंझमाम म्हणाला.
ऋषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्याआधी वृद्धीमान साहाला दुखापत झाली आणि पंतला संघात स्थान मिळाले. त्याने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. यानंतर हाच धडाका त्याने इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत देखील कायम ठेवला. यानंतर त्याच्या खेळीची क्रिकेट विश्वाने दखल घेतली असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमामनेही ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात इंझमामने सांगितलं की, 'ऋषभ पंत अतिशय उत्तम खेळाडू आहे. खूप दिवसांनी मी असा खेळाडू पाहिला. ज्याच्यावर दबावाचा कोणताही परिणाम होत नाही. १४६ धावांवर ६ गडी बाद झालेले असतानाही ज्या पद्धतीने तो सुरुवात करतो. तसेच मनाला वाटेल तसे शॉट खेळतो. यावेळी खेळपट्टी कशी आहे किंवा समोरच्या संघाने किती धावा केल्या आहेत, याचा त्याला फरक पडत नाही. फिरकी असो किंवा वेगवान गोलंदाज दोघांविरोधात त्याची बॅटिंग उत्तम आहे. त्याला खेळताना पाहून मी देखील आनंद लुटत होतो. जणू काही अस वाटत की, सेहवाग डाव्या हाताने खेळत आहे.'