पुणे - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेसह आगामी आयपीएल २०२१ ला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात मागील वर्षी दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण अंतिम फेरीत त्यांचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सने त्यांना पराभूत केले. यामुळे दिल्लीला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. पण आता दिल्लीच्या संघाला श्रेयसच्या रुपात मोठा धक्का बसला आहे.
अशी झाली दुखापत -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही घटना घडली. इंग्लंड डावातील आठव्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने जोरदार फटका लगावला. हा चेंडू रोखण्यासाठी श्रेयसने हवेत झेप घेतली आणि चेंडू पकडला. यादरम्यान त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले.
दरम्यान, आता श्रेयसची दुखापत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. त्याला यातून सावरण्यासाठी बराच काळ लागेल, असे म्हटलं जात आहे. यामुळे श्रेयसला आयपीएल २०२१ ला मुकावे लागण्याची शक्यता आहे. अद्याप यासंदर्भात बीसीसीआय आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा -ICC Ranking : टी-२० क्रमवारीत विराटची आगेकूच, राहुलची घसरण
हेही वाचा -प्रसिद्ध कृष्णा एकदिवसीय पदार्पणात 'अशी' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच गोलंदाज