नवी दिल्ली -कोणत्याही उंच इमारतीला घट्ट आणि मजबूत पायाची आवश्यकता असते. आज भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटमध्ये अशीच उंची गाठली असली तरी त्याचा पाया ७० आणि ८०च्या दशकात रोवला गेला. या दशकानंतर, विविध अंगांनी सुधारणा होत आज अभेद्य असा संघ म्हणून भारतीय क्रिकेट संघाकडे पाहिले जाते. या संघाच्या उत्क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारा एकमात्र क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव. १९८३चे विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघात आत्मविश्वास जागृत करून देणाऱ्या कपिल देव यांनी आज ६१व्या वर्षात पदार्पण केले.
हेही वाचा -चहल, पंत आणि सॅमसनने केली आपल्याच फिटनेस ट्रेनरची धुलाई..! पाहा व्हिडिओ
लाकूड व्यापाराच्या घरात जन्म -
कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी चंदीगड येथील एका लाकूड व्यापाराच्या घरात झाला. त्यांचे पालक भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी पाकिस्तानात राहत असले तरी फाळणीनंतर ते भारतात आले. लहानपणापासूनच कपिल देव यांना क्रिकेटची आवड होती. हीच आवड त्यांनी शेवटपर्यंत जपली.
माजी क्रिकेटपटू देशप्रेम आझाद यांच्याकडून मिळाले प्रशिक्षण -
प्रथम शाळेत आणि नंतर महाविद्यालयात क्रिकेटबद्दलची आवड पाहून कपिल देव यांच्या कुटुंबीयांनी त्यांना क्रिकेट शिकण्यासाठी पाठवले. त्यांना माजी क्रिकेटपटू देशप्रेम आझाद यांनी प्रशिक्षण दिले. १९७५मध्ये हरयाणाकडून रणजी करंडक खेळण्याची त्यांना संधी मिळाली, आणि कपिल देव यांचा क्रिकेटप्रवास सुरू झाला. पहिल्याच सामन्यात त्यांनी सहा गडी बाद करत आपल्यातील चुणूक दाखवून दिली. रणजीच्या त्या हंगामात कपिल देव यांनी १२१ फलंदाजांना माघारी पाठवले होते. रणजीमधील शानदार कामगिरीनंतर त्यांना इराणी करंडक, दुलीप ट्रॉफी आणि त्यानंतर विल्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
भारतीय संघात पदार्पण -
घरगुती क्रिकेटमध्ये गोलंदाजीची छाप पाडल्यानंतर त्यांनी १ ऑक्टोबर १९७८ला पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि याच महिन्याच्या १६ तारखेला पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या काही दिवसानंतर कपिल देव यांनी 'दादा' संघ अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. पहिल्या २५ सामन्यात १०० गडी आणि १००० धावा करणारे कपिल देव पहिलेच भारतीय खेळाडू ठरले. तोपर्यंत भारतीय संघात एका महान अष्टपैलू खेळाडूने जागा घेतल्याची जाणीव संपूर्ण जगाला झाली होती.
कर्णधार पदाचा किस्सा -
नेतृत्वाचा गुण कोणत्याही प्रकारे समोर येतो. हीच गुणवत्ता हेरून १९८२मध्ये श्रीलंकाविरुद्ध कपिल देव यांना संघाचे कर्णधारपद देण्यात आले. या कर्णधारपदाचा किस्साही रंजक आहे. 'लिटल मास्टर' आणि तंत्रशुद्ध फलंदाज सुनील गावस्कर यांना त्या सामन्यात विश्रांती देण्यात आल्याने कपिल देव यांच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि त्यापासून ते संघाचे नियमित कर्णधार झाले. १९८३मध्ये 'अंडरडॉग' असलेल्या भारतीय संघाने विंडीजचा पराभव करत पहिल्यांदा विश्विविजेतेपद पटकावले आणि कपिल देव यांचे नेतृत्व जगाने मान्य केले. या विश्वचषकात त्यांनी ३०३ धावा केल्या आणि १२ बळीही घेतले. इतकेच नव्हे तर क्षेत्ररणातही संघाची बाजू बळकट ठेवत सात झेल पकडले होते.
विशेष ओळख -
१९९४मध्ये कपिल देव यांनी आपल्या १६ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे कपिल देव हे त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीतील १८४ डावात कधीच धावबाद झाले नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात ५०००हून अधिक धावा आणि ४००हून अधिक बळी टिपणारे ते एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. ११ मार्च २०१० रोजी कपिल देव यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले. त्यांनी गॉड्स डिक्री', 'क्रिकेट माय स्टाईल', 'स्ट्रेट फ्रॉम द हार्ट', अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. कपिल देव यांच्या जीवनावरही एक चित्रपट येणार असून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्यांची भूमिका साकारली आहे.