हैदराबाद -भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर केएल राहुलने आपल्या ३२ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मोठा इतिहास रचला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या विंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
हेही वाचा -बारामतीचे सतीश ननवरे तिसऱ्यांदा 'आयर्नमॅन'
या विक्रमासोबतच जलदगतीने १००० धावा पूर्ण करणारा राहुल दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर, असा विक्रम करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. विक्रमाच्या या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी, सुरेश रैना, शिखर धवन आणि युवराज सिंग यांनी हे स्थान मिळवले होते.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने २७ डावांमध्ये तर, राहुलने २९ डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम आघाडीवर आहे. बाबरने फक्त २६ डावात १००० धावा पूर्ण करण्याची किमया केली आहे.
विशेष म्हणजे बांगलादेशविरूद्धही राहुल चांगल्या फॉर्मात होता. भारताने बांगलादेशचा 2-1 असा पराभव केला. त्याने नागपुरात जबरदस्त खेळी साकारली होती. नागपूरमध्ये राहुलने अर्धशतक झळकावले होते. शिवाय, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून या स्पर्धेत त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत.