मेलबर्न -भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वकरंडक स्पर्धेतील यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून सहज पराभव केला. लंकेच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या राधा यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा -अवघ्या १२ धावात घेतले १० बळी...पाहा व्हिडिओ
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय लंकेच्या अंगउलट आला. श्रीलंकेने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावा केल्या. त्यांची कर्णधार चमारी अटापट्टू वगळता इतर फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले. अटापट्टूने ५ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. तळाची फलंदाज कविशा दिल्हारीने २५ धावा करत संघाला आधार दिला. भारताकडून राधा यादवने ४ षटकात २३ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. तर, राजेश्वरी गायकवाडला २ बळी मिळाले.
लंकेच्या ११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. फॉर्मात असलेल्या शेफालीने ७ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा टोलवल्या. स्मृती मंधानानेही १७ धावा केल्या. शेवटी जेमिमा रॉ़ड्रिग्ज आणि दीप्ती शर्माने १४.४ षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.