लंडन -पुढील महिन्यात होणारी अंडर -१९ विश्वकरंडक स्पर्धा लक्षात घेऊन भारतीय युवा खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. १९ वर्षांखालील झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने आफ्रिकेला ९ बळींनी मात दिली. आफ्रिकेच्या १८७ धावांचा पाठलाग करताना ४५ चेंडू राखून भारताने विजय मिळवला.
हेही वाचा -गांगुलीच्या 'त्या' निर्णयावर केविन रॉबर्ट्स यांनी दिलं मत, म्हणाले...
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४८.३ षटकांत १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय फलंदाजांनी ४२.३ षटकांत १ बाद १९० धावा करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकेसाठी ल्यूक ब्यूफर्टने ९१ चेंडूत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ६४ धावा केल्या. ऑफस्पिनर रवी बिश्नोईने ३६ धावा देऊन ३ बळी घेतले. त्याशिवाय कार्तिक त्यागी, शुभांग हेगडे आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
त्यानंतर, भारतीय संघाचा सलामीवीर दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद ८६ धावा, तिलक वर्माच्या ५९ धावा आणि कुमार कुशाग्राच्या ४३ धावांमुळे भारताला हे आव्हान सहज साध्य करता आले. दिव्यांश आणि तिलक यांनी पहिल्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना शनिवारी खेळला जाईल.