मुंबई - भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात, कसोटी मालिकेत २-१ ने धूळ चारली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे कौतूक केले. यात आता आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाचे कौतूक केले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना विल्यमसन म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे नेहमी आव्हानात्मक असते. त्यात जर त्यांच्याच देशात खेळायचे झाल्यास हे आव्हान अधिक कठिण बनते. अनेक अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर देखील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविला. वास्तविक हे उल्लेखणीय कामगिरी आहे.'
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या संदर्भात सांगायचे झाल्यास भारतीय संघाने आव्हानाचा दृढ निश्चयाने सामना केला, ही बाब प्रशंसनीय आहे. गाबा कसोटीत तर भारताच्या गोलंदाजांकडे एकूण सात ते ८ कसोटी सामन्याचा अनुभव होता, असे देखील विल्यमसन म्हणाला.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा न्यूझीलंड संघाला झाला आणि न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका संघाला संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर आता सर्व समीकरणे आहेत.
भारतीय संघाने जर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत किमान दोन विजय मिळवले तर तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. इंग्लंडला अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी तीन सामने जिंकावी लागणार आहेत. तर उभय संघातील ही मालिका जर अनिर्णीत राहिली तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहचेल. दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या दरम्यान, ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.
हेही वाचा -WTC : फायनलचे तिकीट पक्के केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन म्हणाला...
हेही वाचा -Video : ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज