हैदराबाद -मुंबईचा अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबेने कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) ड्राफ्टसाठी आपले नाव पाठवले आहे. मात्र, भारतातील स्थानिक क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत त्याला बीसीसीआयकडून परवानगी मिळण्याची शक्यता नाही. अबू धाबी येथे टी-10 लीगमध्ये भाग घेतल्यामुळे बीसीसीआयने तांबेला यंदाच्या आयपीएलमध्ये भाग घेता येणार नसल्याचे सांगितले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला इंडियन प्रीमियर लीगसह सर्व प्रकारच्या स्थानिक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरच दुसर्या देशात स्थानिक टी-20 लीग खेळण्याची परवानगी आहे. कॅनडामध्ये ग्लोबल टी-20 लीग खेळण्यापूर्वी युवराज सिंगने हे केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच त्याने परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतील किंवा त्यांनी त्यापासून दूर राहून इतर देशांच्या लीगमध्ये खेळावे, असे बीसीसीआयच्या नियमात स्पष्टपणे म्हटले आहे.