मुंबई -आयसीसीच्या क्रिकेट समितीने कोरोनानंतर क्रिकेटमध्ये लाळेचा वापर थांबवण्याची शिफारस केली. त्यानंतर, भारतीय संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने या प्रकरणी एक पर्याय सुचवला आहे. हरभजन म्हणाला, ''कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये समान स्पर्धा राखण्यासाठी दोन्ही टोकांपासून वेगवेगळे चेंडू वापरता येऊ शकतात.'' कोरोना व्हायरसमुळे येत्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये बरेच बदल दिसू शकतात. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, कसोटी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूला चमक देण्यासाठी लाळेच्या जागी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास मान्यता मिळू शकते.
हरभजन म्हणाला, "तुम्ही दोन्ही बाजूंनी (विकेटच्या) दोन चेंडू वापरू शकता. तुम्ही एक चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी तर दुसरा चेंडू स्विंगसाठी वापरू शकता. मी असे म्हणत नाही की तुम्ही दोन्ही चेंडूंचा वापर 90 षटकांसाठी करा. हे चेंडू तुम्ही 50 षटकांनंतर बदलू शकता. कारण दोन्ही चेंडू 50 षटकांनंतर जुने होतील. या चेंडूना चमक येणार नाही आणि घाम किंवा लाळ वापरण्याचा प्रश्नच नाही. नवीन चेंडू एकाच टोकापासून किंवा दोन्ही टोकांपासून वापरण्यासंबंधी कर्णधाराला पर्याय असावा. परंतु एक चेंडू 50 षटकानंतर वापरला जाऊ नये."