नवी दिल्ली -ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या मोहम्मद सिराजने स्वत: साठी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. सिराजने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन कारचा व्हिडिओ शेअर केला. ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या सिराजने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चेन्नईतील कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना डावलले
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून सिराज गुरुवारी आपल्या मूळ गावी हैदराबादला परतला. हैदराबाद गाठल्यावर सिराजने आपल्या वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजच्या वडिलांचे निधन झाले. कठोर कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे आणि देशाप्रति असलेल्या प्रेमामुळे आणि सिराज संघासोबत थांबला. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात राष्ट्रगीत सुरू असताना सिराज भावनिक झाला. याच सामन्याच्या एका डावात सिराजने पाच बळी घेत वडिलांना मानवंदना दिली.