मुंबई -'कसोटी क्रिकेट' हे क्रिकेटचे प्राथमिक अंग म्हणून ओळखले जाते. सध्या आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या प्रस्तावाला सर्वच बाजूंनी विरोध होत आहे. मर्यादित षटकांच्या वेळापत्रकासाठी या 'कंटाळवाण्या' क्रिकेट प्रकाराला एका बाजूला लोटणे हे कोणत्याही कसोटीपटूला नक्कीच पाहवणार नाही. जुने, अनुभवी आणि कसोटी 'स्पेशालिस्ट' असणाऱ्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या या 'आत्म्या'ला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक नाव म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड. 'द वॉल' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने आज वयाची ४७ वर्षे पूर्ण केली.
हेही वाचा -महाराष्ट्राचा 'वीर' यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार!
सरळ-साधे व्यक्तिमत्व, तंत्रशुद्ध शैलीचा बादशहा, मेहनती, जॅंमी, जेंटलमॅन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एमबीएचे शिक्षण सुरू असताना द्रविडने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर १९९६ मध्ये त्याने आपला पहिला सामना खेळला होता. दुखापतग्रस्त संजय मांजरेकरच्या जागी द्रविडला मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात त्याने ९५ धावांची जबरदस्त खेळी साकारली होती.
पदार्पणाच्याच सामन्यात 'निवृत्त' झालेला एकमेव क्रिकेटपटू -
कसोटी त्यानंतर एकदिवसीय क्रिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडला टी-२० संघात पाहणे अनेक लोकांना 'जड' गेले. कसोटीत नांगर टाकून बसणाऱ्या द्रविडला टी-२० मध्ये मात्र मोठे यश मिळवता आले नाही. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेला टी-२० सामना द्रविडचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्याने ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. 'टी-२० पदार्पणात संथ, सावध सुरुवात करणाऱ्या द्रविडची टी-२० कारकिर्द कव्हरमध्ये कॅच देऊन संपुष्टात आली', असे त्यावेळी समालोचनात म्हटले गेले. या सामन्यात इंग्लंडने सहा गडी राखून बाजी मारल्यामुळे त्याला टी-२० क्रिकेटमधून विजयी निरोप देण्याचे भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नाही.