मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी सोशल मीडियावर एक व्हिडोओ पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात धोनीने एका माजी खेळाडूची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.
धोनीने निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर त्याने पुढील काही मिनिटातच भारताचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सहाय्यक प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांची भेट घेतली. याबाबत बालाजी यांनी सांगितले की, धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो माझ्याजवळ आला. माझ्याशी तो काय बोलणार, याची मला काहीच कल्पना नव्हती. मी पण धोनीच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे शॉकमध्ये होतो.
धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी पिचची देखभाल करणाऱ्या व्यक्तींना जास्त पाणी मारायला सांगितले आहे. निवृत्तीनंतरही धोनी क्रिकेटबद्दल एवढा बारीक विचार करतो, हे पाहून मला दुसरा धक्का बसला, असे बालाजी यांनी सांगितले. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी तयारीला लागला आहे. यासाठी धोनी संघातील काही खेळाडू आणि संघ व्यवस्थापनासोबत सराव सत्रात सहभागी झाला आहे.