नवी दिल्ली - भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने क्रिकेटमध्ये लाळ वापरण्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रिकेटमध्ये लाळ वापरण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. क्रिकेटविश्वातून अनेक क्रिकेटपटूंनी याप्रकरणी आपले मत दिले. आता बुमराहची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बुमराह म्हणाला, ''मैदानात गळाभेट घेणाऱ्यापैंकी मी नाही. पण लाळेची कमतरता तुम्हाला भासू शकते. क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यावर मार्गदर्शक सूचना काय असतील हे मला माहित नाही. परंतु यासाठी काहीतरी पर्याय असावा. चेंडूवर लाळ न वापरल्याने क्रिकेट फलंदाज अनुकूल ठरेल. लाळ न वापरल्याने गोलंदाजांना अडचण निर्माण होते. मैदाने लहान होत आहेत आणि विकेटही सपाट होत आहेत.''