मुंबई- ऑस्ट्रेलियाच्या एका क्रीडा वाहिनीने क्रिकेटच्या इतिहासातील Worst Tailenders म्हणजेच सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या, तळातील दुबळ्या फलंदाजांची, एक यादी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा दोन खेळाडूंचा समावेश आहे. पहिले नाव आहे अजित आगरकर आणि दुसरे जसप्रीत बुमराह याचे. अजित आगरकरने त्याच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. पण त्याचेही नाव या यादीत समाविष्ट केल्याने भारतीय क्रिकेट जाणकार आणि चाहते यांच्याकडून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी, आगरकराचे नाव टेलिंडर्सच्या यादीत समावेश केल्याने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी क्रीडा वाहिनीला खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, आगरकर? त्याच्या नावावर एक कसोटी शतक आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २१ चेंडूत ५० धावा केल्या आहेत.
दरम्यान, अजित आगरकर याने १९१ एकदिवसीय आणि २६ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे. यात त्याने कसोटीत एक शतक तर एकदिवसीय सामन्यात ३ अर्धशतकं केली आहेत. दुसरीकडे जसप्रीत बुमराहचे नुकतेच करिअर सुरू झाले आहे. पण त्याचे नाव इतक्या लवकर या यादीत समावेश केल्यानेही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.