मुंबई- पाकिस्तान क्रिकेट लीग स्पर्धेतील इस्लामाबाद युनायटेड संघाने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कोरोना संदर्भात मॅसेज देण्यासाठी, बुमराहकडून टाकण्यात आलेला नो बॉलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी, लाइन क्रॉस करू नका नाही तर महागात पडेल, असे म्हटलं आहे. पण, हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. बुमराहच्या ऐवजी ते स्वत: ट्रोल झाले आहेत.
इस्लामाबाद युनायटेड संघाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन बुमराहचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील आहे. बुमराहकडून टाकण्यात आलेला हा चेंडू नो बॉल होता. बुमराहच्या या नो बॉलमुळे सलामीवीर फखर जमानला जीवनदान मिळाले होते. यानंतर त्याने ११४ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
इस्लामाबाद संघाने, कोरोना संदर्भात मॅसेज देताना, बुमराहचा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, 'लाइन क्रॉस करू नका नाहीतर महागात पडेल. अंतर ठेवा पण स्वत:च्या हृदयाजवळ राहा.'