मुंबई- जगभरातील गोलंदाजांसाठी डोकेदुखी असलेला टीम इंडियाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्मा आज आपल्या वयाची ३३ वर्ष पूर्ण करतो आहे. रोहितने त्याच्या धडाकेबाज शैलीच्या जोरावर क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मुंबईकरांना सचिननंतर रोहित शर्मा आवडीचा खेळाडू आहे. अशा हरहुन्नरी खेळाडूकडे एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. ही बाब अनेक लोकांना कदाचित माहित नसेल.
रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ साली नागपूरमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताचीच. वडील गुरुनाथ शर्मा एका खाजगी संस्थेचे केअर टेकर तर आई पोर्णिमा हाउसवाईफ होती. रोहित जेव्हा दीड वर्षाचा झाला. तेव्हा गुरूनाथ शर्मा कुटुंबासह डोंबिवलीला आले. रोहितच्या लहान भावाचे नाव विशाल असे आहे. वडील गुरूनाथ दोन मुलांचा साभाळ करु शकत नसल्याने, रोहितचे बालपण त्यांच्या अंकलकडेच झाले. रोहित अधून-मधून आई-वडीलांना भेटण्यासाठी जात असे.
रोहितला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड. हलाकीची परिस्थिती असल्याने, त्याला शाळेची फीसुद्धा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागे. अशा परिस्थितीतही रोहितचे क्रिकेटप्रती प्रेम कमी झाले नाही. तो तासंनतास क्रिकेट खेळत असे. तसेच क्रिकेट विषयावर तो त्याच्या अंकलशी चर्चा करत असे. रोहितची क्रिकेटप्रती आवड पाहून अंकल आणि त्यांच्या मित्रांनी काही पैसै गोळा करुन रोहितला एका क्रिकेट अॅकडमीमध्ये घातले.