मुंबई - ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात चार सामन्याच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मायदेशी आगमन झाले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दिल्ली विमानतळावर दिसून आला. यावेळी त्याचेही स्वागत उपस्थितांनी केले.
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मायदेशी परतले भारतीय संघाने इतिहास रचला
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यानंतर मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, अशा कठीण परिस्थितीत अजिंक्यने मोठ्या कौशल्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीने कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला.
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.
पंतप्रधानांनी ही केले होते कौतूक
ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक कसोटी मालिकाविजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले होते. पंतप्रधानांनी ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाच्या यशावर सर्वजण आनंदी असल्याचे सांगितले. ब्रिस्बेनच्या गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून पराभूत केला होता.
हेही वाचा -कोण आत,कोण बाहेर? वाचा आयपीएलमधील सर्व संघांच्या 'रिटेन-रिलिज' खेळाडूंची यादी
हेही वाचा -EXCLUSIVE: मोहम्मद सिराजच्या मोठ्या भावाची 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत