महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सामाजिक बांधिलकी..! लिटल मास्टर सुनिल गावस्कर उचलणार 34 मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च

पश्चिम विभागातील हे अशा प्रकारचे पहिलेच सेंटर असून या ठिकाणी मोफत सेवा पुरवण्यात येतील. हे सेंटर श्री सत्य साई बाबांच्या दर्जेदार आरोग्य शुश्रुषेच्या मॉडेलवर आधारीत आहे. सेंटरमध्ये या महिन्यात पुढे पहिली पेडियाट्रिक कार्डियाक शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

गावस्कर उचलणार 34 मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च

By

Published : May 3, 2019, 3:29 PM IST

Updated : May 3, 2019, 6:48 PM IST

ठाणे - खारघरमध्ये आज श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर सेंटरचे उद्घाटन दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके केली आहेत. त्याचेच औचित्य साधून गावस्कर यांनी 34 जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली. या बालरोग हृदय शस्त्रक्रिया समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील मुलांच्या करण्यात येणार असून त्यासाठी पुढील काही महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

सुनिल गावस्करांची सामाजिक बांधिलकी


या सेंटरमध्ये जन्मजात हृदयविकार असणार्‍या मुलांवर उपचार केले जाणार आहेत, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक आहे. तळागाळात आरोग्यविषयक काम करणार्‍या आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनाही लहान मुलांबाबत कार्डियाक रोगांचे निदान आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागात प्राथमिक स्वरुपातील मातृत्व आणि बालक यांच्या आरोग्य सेवांचा दर्जा सुधारता येईल.


भारतात प्रत्येक वर्षी सुमारे 2 लाख 40 हजार मुले जन्मजात हृदय विकारासह जन्मत असतात. यापैकी सुमारे 40 टक्के बालकांचा मृत्यू 3 वर्षांच्या आतच होतो. याचे कारण म्हणजे महागड़्या आणि सहज उपलब्ध होउ न शकणार्‍या बाल हृदयविकार उपचार सुविधा बहुतेक नागरिकांच्यापर्यंत पोहचूच शकत नाहीत. अशा नागरिकांच्यासाठी श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्समधील बाल हृदयविकार सुविधा एक वरदान ठरत आहेत. श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सची साखळी महाराष्ट्रातील नवी मुंबई, छत्तीसगढमधील नया रायपूर आणि हरियाणातील पलवालमध्ये सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी भारतात सर्वात मोठ्या प्रमाणावर संपुर्ण मोफत बाल हृदयविकार उपचार सुविधा पुरवण्यात येतात. येथे आतापर्यंत 8 हजार 600 हून अधिक शस्त्रक्रिया आणि कॅथेटर इंटरव्हेंशन पूर्ण करण्यात आली असून 71 हजारहून अधिक मुलांवर रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले आहेत.


उद्घाटनावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनिल गावस्कर म्हणाले, 'या बालकांच्या हृदयास उपचारांची अतिशय आवश्यकता आहे. बाल हृदयविकार उपचार हे देशातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचले पाहिजेत. भले ती मुले कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक स्तरातील पालकांची असोत. श्री सत्य साई संजीवनी सेंटर आता मुंबईत सुरु होत असून ते लोकांना जीवनरक्षक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देईल याचे मला अतिशय समाधान वाटत आहे.”या वेळी सुनिल गावसकर यांनी स्वतः एचडी मेडिकल कंपनीने बनवलेल्या कार्डियाक मेडिकल डिव्हाईस स्टेथस्कोप घेऊन लहान मुलाचे आरोग्य तपासले.


यावेळी अमेरिकेतील एचडी मेडिकल कंपनीने बनवलेल्या कार्डियाक मेडिकल डिव्हाईस कम सेवा लाँच करण्यात आली आहे. एचडी स्टेथ नावाचे हे डिव्हाईस म्हणजे ईसीजी इंटिग्रेटेड इंटिलिजंट स्टेथोस्कोप आहे. एचडी मेडिकल कंपनीचे संस्थापक अरविंद थियागाराजन यांनी हे उपकरण तयार केले आहे. एचडी मेडिकलकडून लहान गावे तसेच आदिवासी विभागात काम करणार्‍या रुग्णालयांचे कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेवकांना एचडी स्टेथच्या वापराबाबत प्रशिक्षीत करण्यात येत आहे. हे डिव्हाईस म्हणजे एक स्मार्ट स्टेथोस्कोप आहे, जो आर्टिफिशिअल इंटिलिजंस म्हणजेच एआयचा वापर करुन टॅबलेट किंवा स्मार्टफोनशी एका अ‍ॅपद्वारे कनेक्ट होउन मुलांमधील ओळखता न येणार्‍या हृदयविकारांचे निदान करतो.

Last Updated : May 3, 2019, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details