हैदराबाद - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत असून मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी घेतली आहे. यामुळे भारतासाठी पुढचा दुसरा सामना 'करो की मरो' असा आहे. दरम्यान मागील तीन एकदिवसीय मालिकेचा विचार केल्यास, भारताने पहिला सामना गमावलेला आहे. पण त्यानंतर भारताने मालिकेत शानदार वापसी करत मालिका जिंकलेली आहे.
भारत-वेस्ट इंडीज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात आली. भारताने या मालिकेतील पहिला सामना गमावला. वेस्ट इंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हा भारताने दुसऱ्या सामन्यात शानदार वापसी करत सामना १०७ धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवत, मालिका २-१ ने जिंकली होती.
विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर भारताने ऑस्ट्रेलियासोबत ३ सामन्याची मालिका खेळली. या मालिकेतीलही पहिला सामना भारताने गमावला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १० गडी राखून जिंकला. त्यानंतर भारताने दमदार वापसी केली. दुसरा सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. तिसऱ्या आणि निर्णयाक सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली.