राजकोट -भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जेथे उभय संघ चार कसोटी सामने खेळतील.
पुजाराने शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, "मला माझी लय सापडत आहे.'' व्हिडिओमध्ये पुजारा डाईव्ह, पुल आणि डिफेन्स शॉट्स खेळताना दिसत आहे.
पुजाराने मार्चमध्ये न्यूझीलंड विरुद्ध ख्राईस्टचर्च येथे भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याने नुकताच भारतीय संघाबरोबर एक फोटो शेअर केला होता. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ उत्सव साजरा करतानाचा हा फोटो आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला 3 डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला अॅडलेड येथे दुसरा, 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि 3 जानेवारी 2021 मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघ विदेशी खेळपट्टीवर आपला पहिला 'डे-नाईट' कसोटी सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) 3 ते 7 जानेवारी 2021 ला हा सामना रंगणार आहे.