कोलकाता - येथील ईडन-गार्डन मैदानावर खेळवल्या गेलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशी वाघांची शिकार करत एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत कसोटी मालिकाही भारताने खिशात घातली. याअगोदर झालेली टी-२० मालिकाही भारताने जिंकली होती.
हेही वाचा -IND VS BAN : विराटची ऐतिहासिक शतकी खेळी, पाहा व्हिडिओ
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मुशिफिकूर रहीम (७४) आणि महमुदउल्लाह (३९) यांचा अपवाद वगळता एक फलंदाज भारताच्या गोलंदाजी समोर टिकाव धरू शकला नाही. उमेश यादवने घेतलेल्या ५ आणि ईशांत शर्माच्या ४ बळींच्या जोरावर भारताने हा सामना डावाने जिंकत मालिकाही खिशात घातली. भारताकडून उमेश यादवने १४.१ षटकात ५३ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले. तर ईशांत शर्माने १३ षटकात ५६ धावा देत ४ गडी बाद केले.
दोन्ही डावात मिळून ७८ धावांत ९ बळी घेतलेल्या इशांत शर्माला सामनावीराचा किताब मिळाला. या विजयामुळे भारताने लागोपाठ चार कसोटी सामने डावाने जिंकण्याचा पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा भारत पहिला संघ ठरला आहे. शिवाय गुलाबी चेंडूवर खेळवलेला हा विशेष कसोटी सामना भारताने जिंकला. तसेच या विजयामुळे सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानी पोहचला आहे. विराटच्या नावावर ३३ कसोटी विजय झाले आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (५३ कसोटी विजय) पहिल्या क्रमांकावर आहे.