मुंबई - भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. मात्र, या बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सद्या भारतीय महिला संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून बीसीसीआयने या खेळाडूंना भत्ता वेळेवर दिलेला नाही. यामुळे भारतीय महिला संघावर नामुष्कीची वेळ आली आहे.
भारतीय संघ विदेश दौऱ्यावर जात असताना बीसीसीआयच्या वतीने खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला तेथील खर्चासाठी एक ठराविक रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. मात्र ती रक्कम वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाला देण्यात आलेली नाही. यामुळे महिला खेळाडूंना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर महिला संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयला याबाबत सूचना मिळाल्यानंतर आता त्यांच्या खात्यामध्ये दैनिक भत्त्याची रक्कम डिपॉझिट केल्याचे वृत्त आहे.