लखनौ - दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.
लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना मैदानात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मानधाना (१०) संघाची धावसंख्या १७ असताना बाद झाली. चांगल्या सुरूवातीनंतर प्रिया पुनियाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. ती वैयक्तिक ३२ धावांवर बाद झाली. तेव्हा भारताची अवस्था १६व्या षटकात २ बाद ६१ अशी झाली.
अनुभवी पूनम राऊतने कर्णधार मिताली राजच्या साथीने भारताचा डाव सावरला. पूनमने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. तिने १२३ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. तिला मिताली राजने ४५ तर हरमनप्रीत कौरने ५४ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ४ बाद २६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तुमी सेखकुनेने सर्वाधिक २ बळी घेतले.