नवी दिल्ली - भारतीय महिला संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. आफ्रिकेने दिलेले १६४ धावांचे आव्हान भारतीय संघाने ४१. ४ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला. आफ्रिकेची सलामीवीर ली भोपळाही न फोडता परतली. झुलन गोस्वामीने तिला बाद केले. संघाची धावसंख्या ३२ असताना दीप्ती शर्माने त्रिशाला बाद करुन दुसरा धक्का दिला. त्यानतंर लॉरा वोल्व्हार्ट (३९) आणि मॅरीझन्ने कॅप्प (५४) वगळता आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही आणि आफ्रिकेचा डाव ४५.१ षटकात १६४ धावांवर संपुष्टात आला. भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन गडी टिपले. तर त्याला शिखा पांडे ( २/३८), एकता बिस्त (२/२८) आणि पूनम यादव (२/३३) यांची उत्तम साथ लाभली.