मुंबई - वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय महिला संघाचा विजय, मालिकाही खिशात - 2nd ODI
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्कायव्हरने केलेल्या ८५ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नसल्याने इंग्लंडचा संघ ४३.३ षटकांमध्ये १६१ धावांवर गारद झाला. भारताकडून शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी ४ विकेट तर पूनम यादवने २ विकेट गारद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंडने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ४१.१ षटकांमध्ये ३ विकेट गमावत विजय मिळवला. भाकताकडून स्मृती मंधानाने ६३ तर कर्णधार मिताली राजने ४७ धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. तर पूनम राऊतनेही ३२ धावांची खेळी करत त्यांना चांगली साथ दिली. मोक्याची क्षणी इंग्लंड फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या झुलन गोस्वामीला 'प्लेयर ऑफ द मॅच'ने गौरवण्यात आले.