मुंबई - भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्याच खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. विजयामुळे ३ सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
आसाम राज्यातील गुवाहाटी येथील बर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या भारतीय संघाला निर्धारीत २० षटकात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
भारताच्या एकाही फलंदाजाला आपल्या नावाला साजेल, अशी कामगिरी करता आली नसल्याने भारताचा संघ ८ विकेट गमावत फक्त १११ धावा करु शकला. भारताच्या मिताली राजने सर्वाधिक २० तर दीप्ती शर्मा आणि भारती फुलमाळीने प्रत्येकी १८ धावा केल्या. गोलंदाजीत इंग्लंडकडून कॅथरीन ब्रन्टने सर्वाधिक ३ विकेट घेतलेत.
भारताने दिलेल्या या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामी फलंदाज डॅनियल व्हॅटने केलेल्या धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. तसेच तळाची फलंदाज विनफिल्डने झुंजार २९ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.