मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाला खास गिफ्ट दिलं आहे. शाह यांनी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरोधात कसोटी सामना खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.
भारतीय महिला संघाने अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१४ साली खेळला होता. हा सामना म्हैसूर येथे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरोधात झाला. यात भारतीय संघाने बाजी मारली. भारतीय संघाने हा सामना एक डाव ३४ धावांनी जिंकला होता. यानंतर महिला संघाने कसोटी सामना खेळलेला नव्हता. आता तब्बल ६ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळणार आहे. याची घोषणा जय शाह यांनी केली आहे.
ऑगस्ट २०१५ नंतर महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त सहा कसोटी सामने झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात झाले आहेत. पण आता भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळेल, अशी घोषणा जय शाह यांनी केली आहे.