पोर्ट ऑफ स्पेन - भारतीय महिलांनी अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिलांनी पाच सामन्यांची मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.
विजयानंतर भारतीय महिला क्रिकेटचा संघ....(फोटो- बीसीसीआय ट्विटर) भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ३ बाद १३४ धावा केल्या. सलामीवीर जोडी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना अनुक्रमे ९ आणि ७ धावांवर स्वस्तात बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज आणि वेदा कृष्णमुर्ती या जोडीने भारताचा डाव सावरला. दोघींनी तिसऱ्या गडीसाठी शतकी भागिदारी केली. जेमिमाने ५६ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. तर वेदाने ४८ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. याच खेळींच्या जोरावर भारताने विडींजसमोर १३५ धावांचे लक्ष ठेवले.
प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित २० षटकात ७ बाद ७३ धावा करु शकला. विंडीजकडून किशोना नाइट (२२) आणि शेमेन कॅम्प्बेल (१९) या दोघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून अनुजा पाटीलने भेदक गोलंदाजी करत ३ षटकात अवघ्या ३ धावा देत २ गडी बाद केले. तिला राधा यादव, पूनम यादव, पूजा वस्त्राकार आणि हर्लीन देओल यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत उत्तम साथ दिली. भारताने ६१ धावांनी हा सामना जिंकला.
हेही वाचा -ऐतिहासिक कसोटीपूर्वीच बांगलादेश अडचणीत, 'हा' खेळाडू दुखापतीने जायबंदी
हेही वाचा -गुलाबी चेंडूवर खेळण्यात आलेले आजपर्यंतचे सामने, कोणता संघ ठरला सरस; वाचा एका क्लिकवर...