ऑकलंड - इडन पार्कवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा एक षटक आणि सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला २०४ धावांचे आव्हान दिले होते. फॉर्मात असलेला लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली आणि मुंबईकर श्रेयस अय्यर यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान सहज पेलले. ५८ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा लवकर माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी पहिल्या दहा षटकाच्या आत संघाची धावसंख्या शंभरपार पोहोचवली. राहुलने २७ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५६ तर, विराटने ३२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर मुंबईकर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडेने भारताचा विजय साकारला. श्रेयसने फलंदाजीचा अप्रतिम नमुना पेश करत २९ चेंडूत ५८ धावा चोपल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर, मनीष पांडे १४ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून इश सोधीला सर्वाधिक २ बळी मिळाले. तर, मिशेल सँटनर आणि ब्लेअर टिकनर यांना प्रत्येकी एक-एक बळी मिळाला.
प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या न्यूझीलंड संघाने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी ८ षटकात ८० धावांची दमदार सलामी दिली. गुप्टिल ३० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विल्यम्सनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ४ चौकार आणि ४ षटकारांसह २६ चेंडूत ५१ धावा ठोकल्या. तत्पूर्वी, मुन्रो ५९ धावांची वादळी खेळी करून बाद झाला. मुन्रोनंतर, अनुभवी रॉस टेलर मैदानात आला. त्यानेही आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या धावसंख्येत वाढ केली. टेलरने २७ चेंडूत नाबाद ५४ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
भारताकडून शार्दुल ठाकूर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने १ बळी घेतला असला तरी, त्याच्या ३ षटकात ४४ धावा कुटल्या गेल्या. शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.