हैदराबाद -भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघ आगामी विश्व करंडक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. प्रत्येक जण दमदार कामगिरी करून संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
हेही वाचा -टी-२० विश्व करंडकासाठी टीम इंडियात फक्त एक गोलंदाजाची जागा शिल्लक - विराट
कर्णधार विराट कोहली संघात परतल्याने भारतीय संघ अधिक बळकट झाला आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताने यंदाच्या ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौर्यावर यजमानांना तिन्ही फॉर्मेटमध्ये क्लीन स्वीप केले होते. गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी -२० मालिकेत भारतीय संघ मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात दडपणाखाली दिसला. मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे संघाला वरच्या फळीत स्थिरता मिळाली आहे. रोहित, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर हे फलंदाजही विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास तयार झाले आहेत.
फलंदाजीशिवाय भारतीय संघाचा गोलंदाजीही घातक दिसत आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या पुनरागमनने संघाला बळकटी मिळाली त्यांना दीपक चहर आणि शिवम दुबे यांचीही साथ मिळू शकेल.