गुवाहाटी- भारत आणि इंग्लंडच्या महिलांत आज बारसपुरा क्रिकेट स्टेडिअम, गुवाहाटी येथे टी-ट्वेन्टी मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताचा पहिल्या २ सामन्यांत अनुक्रमे ४१ धावा आणि ५ गड्यांनी पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघाने मागील काही महिन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु, संघाला टी-ट्वेन्टी सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंड येथेही ३ सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत ३-० अशा पराभवाला भारतीय संघाला सामोरे जावे लागले होते. मागील ६ टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे.
टी-ट्वेन्टी सामन्यात भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मागील २ सामन्यांत भारतीय संघ १२० धावांपेक्षा जास्त धावा करू शकला नाही. प्रभारी कर्णधार स्मृती मंधानाला केवळ २ आणि १२ धावा करताच आल्या आहेत. अनुभवी मिताली राजही चांगल्या सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे.