वेलिंग्टन - हॅमिल्टनवर झालेल्या 'सुपर ओव्हर'च्या थरार नाट्यानंतर वेलिंग्टनला पार पडलेल्या चौथ्या टी-२० सामन्यातही 'सुपरओव्हर'चा रोमांच सर्वांना अनुभवता आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने भारताला ६ चेंडूत १४ धावांचे आव्हान दिले. भारताकडून फलंदाजीस उतरलेल्या लोकेश राहुलने कर्णधार साऊदीला पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल झेलबाद झाला. त्यानंतर विराट आणि संजू सॅमसनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. गोलंदाज शार्दुल ठाकुरने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुख्य सामन्यात भारताच्या १६६ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर मार्टिन गप्टील ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर, कॉलिन मुन्रो आणि टीम सेफर्ट यांनी संघाची कमान आपल्या हाती घेतली. मुन्रोने ६ चौकार आणि ३ षटकारासह ६४ तर, सेफर्टने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी स्थिरावलेला सेफर्ट धावबाद झाला. भारताकडून शार्दुल ठाकुरने २० व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. भारताकडून शार्दुलने सर्वाधिक दोन तर, बुमराह आणि चहल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. या सामन्यात न्यूझीलंडचे तीन फलंदाज धावबाद झाले.
तत्पूर्वी, वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दुखापतग्रस्त केन विल्यम्सनच्या जागी टिम साऊदीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे यांच्या योगदानामुळे २० षटकात ८ बाद १६५ धावा केल्या. राहुलने ३ चौकार आणि एका षटकारासह ३९ तर, पांडेने ३ चौकारांसह ५० धावांची नाबाद खेळी केली.