हैदराबाद - भारत आणि वेस्ट इंडीज संघात उद्या (शुक्रवार दि.६) पासून ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. दरम्यान, या मालिकेत आयसीसीच्या वतीने एक मोठा बदल करण्यात आला आहे.
आता फ्रंट फूटचा नो-बॉल तिसरे पंच देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वाद हे नो बॉलवरून होतात. त्यामुळे या वादावर तोडगा म्हणून नियम आणला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या चुकांना टाळण्यासाठी आता फ्रंट फूट नो-बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे.
बऱ्याच वेळा मैदानावरील पंचांकडून फ्रंट फूट नो-बॉल पाहताना चूक होते. त्यामुळे आता आयसीसीच्या वतीने टीव्ही पंचांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ६ डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत हा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आयसीसीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, याआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या पंचांनी सराव म्हणून 'हॉकआय ऑपरेटर'ची मदत घेतली होती.