किंग्स्टन -वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विंडीजवर कुरघोडी केली आहे. बुमराहने हॅट्ट्रिकसह घतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर विंडीजची दुसऱ्या डावात ७ बाद ८७ धावा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ फॉलोऑनच्या छायेत सापडला आहे.
दुसऱ्या दिवशी मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजीची बुमराहने दाणादाण उडवली. भारताकडून बुमराहने वैयक्तिक १६ धावांत ६ फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्यासमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. सलामीवीर ब्रेथवेट १०, हेटमायर ३४ तर कर्णधार जेसन होल्डर १८ धावा करू शकले. दुसऱ्या डावाचा खेळ संपला तेव्हा हॅमिल्टन २ तर रहकीन कॉर्नवॉल ४ धावांवर नाबाद राहिले.
हेही वाचा - वेश्यांसह नाच-गाणी करणारा शेन वॉर्न अडचणीत, शेजाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार
त्याअगोदर भारताने पहिल्या डावांत हनुमा विहारी १११, विराट कोहलीच्या ७६, इशांत शर्माच्या ५७ आणि मयांक अग्रवालच्या ५५ धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. विहारीने कसोटीमधील आपले पहिले शतक ठोकले. होल्डरने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या, तर रहकीम कॉर्नवॉलने ३ गडी बाद केले. केमार रोच आणि ब्रेथवेट यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा जसप्रीत बुमराह हा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हरभजन सिंह आणि इरफान पठान या दोघांच्या नावावर हा विक्रम होता. हरभजह सिंगने २००१ साली कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर, २००६ मध्ये कराची येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इरफान पठानने हॅट-ट्रिक नोंदवली होती. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी जसप्रीत बुमराह याने किंग्सटन येथे वेस्टइंडीज विरूद्धच्या सामन्यात हा विक्रम रचला आहे.