मुंबई - भारतीय संघाचा 'हिटमॅन' सलामीवीर रोहित शर्माने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. दरम्यान, मालिकेपूर्वी रोहितला या विक्रमासाठी अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र, मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस त्याने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रोहित शर्माने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यात शेल्डन कॉटरेलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत हा विक्रम केला. रोहितचा हा टी-२० क्रिकेटमधील ११६ वा षटकार ठरला.
दरम्यान, क्रिकेट इतिहासात वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी यांनीच आतापर्यंत ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला आहे.
ख्रिस गेलने आतापर्यंत ५३४ तर शाहिद आफ्रिदीने ४७६ षटकार ठोकले आहेत. या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत रोहित शर्माने आपले स्थान पक्क केले.